जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका : खासदार विखे


एएमसी मिरर : नगर 
माझी बांधिलकी फक्त जनतेशी आहे. नगर शहरातील व जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आता सहनशीलतेच्या पलिकडे गेली आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना खडसावले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी व बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्णच करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
खासदार विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.13) बैठक घेतली. यावेळी पीडब्ल्युडीचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पी.बी भोसले, अधिक्षक अभियंता जी.एस मोहीते, कार्यकारी अभियंता राऊत, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, जागतीक बँक प्रकल्प विभागाचे अभियंता एन.एन राजगुरु, कार्यकारी अभियंता मालुंडे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, श्रीगोंदेचे प्रांताधिकारी सुरेश भोसले, पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी केकाण आदींसह सर्व आधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. नगर शहरासह जिल्ह्यातील मार्गांची कामे करतांना त्याचा दर्जा चांगला राहील, याची दक्षता घ्यावी. अर्धवट असलेली रस्त्यांची कामे कालबध्द कार्यक्रम राबवून पूर्ण करावीत. नगर शहरातील भुयारी गटारींची कामे पूर्ण करुनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच नगर शहरातून जाणार्‍या सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीच्या कामांनाही वेग द्यावा. जिल्ह्यातील बाह्यवळण रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम 15 डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. शासनाकडे प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव पाठपुरावा करुन मार्गी लावावेत, अशा सूचना विखे यांनी दिल्या.

विभागांनी स्वतःची जबाबदारी ढकलू नये!
रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा विषय समोर आल्यावर प्रत्येक विभाग दुसर्‍या विभागाकडे बोट दाखवून मोकळा होतो. जबाबदारी ढकलण्याचे काम केले जाते. आज सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्‍यांची बैठक त्यांच्या मुख्य अभियंत्यांच्या उपस्थितीत घेतली आहे. शहरात अतिरिक्त वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवीन बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक आहे. जबाबदारी न ढकलता प्रत्येक विभागाने परस्पर समन्वयातून कामे मार्गी लावावीत, अशा कानपिचक्याही खासदार विखे यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post