नगर : आमदारांच्या इशार्‍यानंतर कचरा संकलन समस्येवर तोडगा


एएमसी मिरर : नगर
शहर व उपनगर परिसरात कचरा संकलनाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक घेऊन अधिकार्‍यांना खुर्चीवर बसू न देण्याचा व आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.8) खासगी संस्थेमार्फत कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरु होईल, या दृष्टीने मनपाकडून नियोजन करण्यात आल्याची माहिती उपायुक्त सुनील पवार यांनी दिली.
महापालिका कर्मचार्‍यांचा कामचुकारपणा, अपुरी यंत्रणा यामुळे शहरात कचरा संकलनाची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. दिवाळीच्या कालावधीतही हा प्रश्न कायम होता. आमदार जगताप यांनी या संदर्भात मनपा आयुक्तांना पत्र देऊन दोन्ही उपायुक्त व घनकचरा व्यवस्थापन विभागाची बैठक घेतली. शनिवारपर्यंत प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उपायुक्त पवार यांनी सायंकाळी घनकचरा विभागाच्या सर्व संबंधित अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व मुकादमांची बैठकही घेतली.
शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने खासगी संस्थेची नियुक्ती केलेली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याशी करारनामा होऊन कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून या संस्थेमार्फत कचरा संकलनाचे काम सुरू होणार आहे. संबंधित संस्थेचे प्रतिनिधी दोन दिवस शहरातील सर्व मार्गांची पाहणी करुन कचरा संकलनाचा ‘रोड मॅप’ तयार करणार आहेत. त्यानुसार वाहन व्यवस्था केली जाणार आहे. कचराकुंडी व्यतिरिक्त रस्त्यावर इतरत्र पडणार्‍या कचर्‍याचे संकलन सुरूवातील मनपाच्या सफाई कामगारांकडून केले जाईल व संस्थेच्या वाहनाद्वारे त्याची वाहतूक होईल. काही दिवस मनपाकडून संबंधित संस्थेला सहकार्य केले जाईल. बैठक घेऊन या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. लवकरात लवकर शहरातील कचरा संकलनाचा प्रश्न मार्गी लागेल, असे उपायुक्त पवार यांनी सांगितले.

‘थ्री स्टार’ रँकींगसाठी प्रयत्नांना सहकार्य : संग्राम जगताप
खासगी संस्थेमार्फत कचरा संकलन सुरू झाल्यानंतर मनपाच्या सफाई कामगारांकडून होणार्‍या साफसफाईची पाहणी केली जाणार आहे. माझ्यासह मनपा अधिकार्‍यांचे पथक अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहे. अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी इच्छाशक्ती दाखविली पाहिजे. इच्छाशक्ती नसल्याने प्रश्न निर्माण होतात. आपले शहर ‘थ्री स्टार’ कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या प्रयत्नांना आपले संपूर्ण सहकार्य राहील, असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले आहे.

संकलनासाठी महापालिकेकडून मायक्रोप्लॅनिंग
प्रत्येक प्रभागातील सर्व परिसरातून, प्रत्येक घरातून कचरा संकलित कसा केला जाईल, या संदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ‘मायक्रोप्लॅनिंग’ करण्यात आले आहे. खासगी संस्थेकडून प्रत्येक प्रभागात पर्यवेक्षक नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्यासमवेत स्वच्छता निरीक्षक व मुकादम कचरा संकलनाच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत. खासगी संस्थेचे प्रतिनिधी दोन दिवस रस्त्यांची पाहणी करुन ‘रोड मॅप’ तयार करणार आहेत. त्यानुसार ‘जीपीएस’ ट्रॅकिंग सिस्टिम असलेल्या वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post