पुण्याच्या धर्तीवर नगरमध्ये कचरा संकलन; नव्या सेवेचे लोकार्पण


40 घंटागाड्या, 10 कंटेनर, 5 कॉम्पॅक्टर, १०० कर्मचारी दाखल

एएमसी मिरर : नगर 
पुणे शहरात ज्या पद्धतीने दैनंदिन कचरा संकलन केले जाते, त्याच धर्तीवर नगर शहरातही दैनंदिन कचरा संकलनाचे काम सुरु करण्यात आले आहे. पुण्यात कचरा संकलनाचे काम करणार्‍या स्वयंभु ट्रान्सपोर्ट या खासगी संस्थेलाच नगर शहरातही दैनंदिन कचरा संकलनाचा ठेका देण्यात आला असून या संस्थेने शहरातील कचरा संकलनासाठी 40 घंटागाड्या, 10 कंटेनर व 5 कॉम्पॅक्टर, १०० कर्मचारी नगरमध्ये आणुन हे काम सुरु केले आहे.
नवीन गाड्यांचे पुजन व कचरा संकलना व्यवस्थेचे लोकार्पण शुभारंभ शनिवारी (दि.9) महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते व आ.संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर करण्यात आले. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, सभागृहनेते स्वप्निल शिंदे, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, अविनाश घुले, अजिंक्य बोरकर, मुजाहिद कुरेशी, बाळासाहेब पवार, सुमित कुलकर्णी, अमित गटणे, संजय ढोणे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अभिकर्ता संस्थेचे दुर्योधन भापकर, जगन्नाथ निंबाळकर, अनिल मुरकुटे, मकरंद देशपांडे, रत्नाकर कुलकर्णी, दिलदारसिंग बीर, सचिन जगताप, अन्वर शेख, किशोर कानडे, सुधाकर भुसारे, किशोर बोरा आदी उपस्थित होते.

कचरामुक्त शहरासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक : आ.जगताप
महापालिकेकडून नागरिकांना सेवा देण्याचे कर्तव्य बजावले जात आहे. सर्वांनी मिळुन कचरा व कचराकुंडी मुक्त शहर करायचे आहे. यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत यावेळी आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर शहराला 3 स्टार मानांकन मिळविण्यासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत संपुर्ण शहर कचरामुक्त होणे आवश्यक आहे. हे मानांकन मिळाल्यास शहराला मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार आहे. स्वयंभु ट्रान्सपोर्ट ही संस्था अनुभवी असून पुण्यात सेवा देत आहे. महापालिकेने कचरा संकलनाचे चांगले नियोजन करावे. प्रभाग समितीनिहाय संपर्क क्रमांक जाहिर करावेत, नगरसेवकांशीही संपर्क ठेवावा, नियोजनाप्रमाणे काम झाल्यास शहराला 3 स्टार मानांकन नक्की मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

घराघरातून होणार कचरा संकलन : महापौर वाकळे
शहरात पुर्वी कचरा संकलनासाठी अतिशय कमी गाड्या होत्या, आता 40 घंटागाड्यांद्वारे प्रत्येक कॉलनीत जावून प्रत्येक घराघरातून कचरा संकलन केले जाणार आहे. रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा, मातीचे ढिग उचलले जाणार आहेत. ओल्या व सुक्या कचर्‍याचे वेगवेगळे संकलन केले जाणार आहे. हॉटेल व बाजारपेठेतील दुकानदारांचा कचरा रात्रीच संकलित केला जाणार आहे. शहरात ठिकठिकाणी 250 डस्टबिन ठेवले जाणार आहेत. शहरात दिवसभर कचर्‍याचे संकलन सुरु राहणार आहे. शहरातील नागरिकांनीही कचरामुक्त शहर या संकल्पनेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी यावेळी केले. कचरा संकलनामुळे नगरकरांना चांगले आरोग्य लाभणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी 28 कोटींचा टीपीआर मंजूर असून त्यातून 68 घंटागाड्या घेतल्या जाणार आहेत. याशिवाय शहरातील खड्ड्यांच्या पॅचिंगचे काम तसेच मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

स्वयंभु संस्थेचे दुर्योधन भापकर म्हणाले, पुणे महापालिकेत आमची संस्था दररोज 600 टन कचरा संकलित करते. संस्थेला 5 वर्षांचा अनुभव आहे. त्याच धर्तीवर नगर शहरातही काम केले जाणार असल्याने यापुढील काळात कचराप्रश्‍नी नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागणार नाही. कचरा संकलनाचे संपुर्ण नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक घंटागाडीवर ध्वनीक्षेपकाद्वारे शहर स्वच्छतेबाबत जनजागृतीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व उपमहापौर मालनताई ढोणे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post