पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करणार : सभागृह नेता स्वप्निल शिंदे


एएमसी मिरर : नगर
महापालिकेने आता नगर शहरात विकासाचे एक-एक पाऊल टाकण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करत आहोत. याचबरोबर नगर शहराच्या वैभवात भर घालणारे प्रकल्प आम्ही राबविणार आहे. पक्षीय राजकारण बाजुला ठेवून आम्ही सर्व नगरसेवक एकदिलाने काम करणार आहे. प्रभाग ४ च्या विकासासाठी आम्ही चारही नगरसेवक कटीबद्ध आहोत. कचरा संकलन व वाहतुकीसाठी आम्ही आज प्रभागामध्ये पदाधिकारी-अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन कचरा संकलन प्रभागापासून सुरू केल्यास लवकरच स्वच्छ शहर सुंदर प्रभाग बनणार आहे, असे प्रतिपादन सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांनी केले.
प्रभाग ४ च्या कचरा संकलन व वाहतुकीचे नियोजन व बंद पाईप गटार कामाची पाहणी सभागृह नेता स्वप्निल शिंदे यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, अमित गटणे, पंजाब सिंध बँकेचे वरिष्ठ प्रबंधक संतोष चौधरी, अनिकेत उमाप, सुधीर खिलारी, कुमार सारसर, शशिकांत नजान, सुरेश वाघ आदी उपस्थित होते.
अजिंक्य बोरकर म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. प्रभाग विकासाची संकल्पना आम्ही हाती घेतली आहे. कचरा मुक्त व कुंडीमुक्त प्रभाग करण्याचा आमचा संकल्प आहे. प्रभाग ४ च्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. प्रभागाच्या व मनपाकडे पाठपुरावा केल्यामुळे प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. पुढील काळात प्रभागामध्ये मंजूर विकास सुरू होणार आहे. नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीमध्ये टाकावा व सहकार्य करावे. गंगा उद्यानाजवळ नगर शहरातील लहान मुलांसाठी भव्यदिव्य असे चिल्ड्रन पार्क उभे करणार आहे. प्रभाग ४ हा मॉडेल प्रभाग बनविणार आहे.
प्रबंधक संतोष चौधरी म्हणाले की, समाजापुढे कचर्‍याची समस्या मोठी आहे. ती सोडविणे गरजेचे आहे. तरुणांच्या हातात सत्ता दिल्यास समाजाचे प्रश्न मार्गी लागतात. कचर्‍याची समस्या संपविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी पंजाब सिंध बँकेच्या माध्यमातून दर गुरुवारी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. प्रभागाच्यावतीने स्वच्छता अभियानामध्ये भाग घेत असल्यामुळे प्रबंधक संतोष चौधरी यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

Post a Comment

Previous Post Next Post