प्रतिभा पवार यांनी कुटुंबातील फूट रोखली?

 एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा शपथविधी झाला त्या दिवसापासून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षामध्ये परत यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाकडून प्रयत्न सुरु होते. अखेर अजित पवार यांनी आज राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी अजित पवारांची समजूत घालण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.
अजित पवार यांच्या मनात प्रतिभा पवार यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांचा शब्द ते मानतात. सुप्रिया सुळे यांचे पती संदानंद सुळे यांच्या माध्यमातून अजित पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट झाल्याचे सांगण्यात येते. अजित पवार यांच्या पाठिशी आमदारही नसल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राजकीय भूमिकेमुळे पवार कुटुंबात फूट अटळ होती. राजकारणामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होऊ नयेत अशी पवार कुटुंबियांची भूमिका होती. त्यासाठीच अजित पवारांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु होते.
अजित पवारांनी शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सहीचे पत्र त्यांच्याकडे होते. बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे सर्वच आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले. त्यामुळे अजित पवार एकाकी पडले होते. उद्या बहुमत सिद्ध करता येणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
अजित पवारांच्या बळावर आम्ही बहुमताचा दावा केला होता. पण अजित पवारांनीच राजीनामा दिल्यामुळे बहुमत सिद्ध करु शकत नाही असे सांगत फडणवीसांनी राजीनामा दिला. अजित पवारांची पुढची राजकीय दिशा कशी असेल ते अजून स्पष्ट झालेले नाही. ते राजकीय सन्यासही घेऊ शकतात अशी चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post