'चर्चा सकारात्मक, उद्याही होणार चर्चा'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाविकास आघाडीची चर्चा सकारात्मक झाली आहे आणि उद्याही होणार आहे अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित झाल्याचं शरद पवार यांनी या बैठकीनंतर सांगितलं. त्यानंतर काही वेळ ही बैठक सुरु होती. मात्र ही बैठक जेव्हा संपली तेव्हा पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची पहिली औपचारिक बैठक मुंबईतील नेहरु सेंटर या ठिकाणी पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची उपस्थिती होती. ही बैठक संपल्यानंतर सगळं काही सकारात्मक आहे. काही मुद्द्यांवर सहमती बाकी आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
सगळं काही सकारात्मक असलं तरीही सत्तास्थापनेचा दावा उद्या केला जाणार नाही. कारण उद्याही बैठक होणार आहे. या बैठकीत काय काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? त्यांनी जर हे पद स्वीकारलं नाही तर शिवसेनेला पर्याय शोधावा लागू शकतो. जर उद्धव ठाकरेंनी त्यांच्याऐवजी दुसऱ्या नेत्याचं नाव दिलं तर त्या नावावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची सहमती व्हावी लागेल. त्यामुळे आता पुढे काय काय घडणार आणि सरकार नेमकं कधी स्थापन होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post