'जे अपात्र होतील, त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु '


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे. अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं. अशा फाटाफुटीतून मी गेलो आहे. महाराष्ट्रात जनमत जे आहे, ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजतं आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, देशात पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला आहे, हे अनेकांना माहित नसावं. त्यामुळे नंतर जी कारवाई होईल, त्यासाठी आम्ही योग्य ती दखल घेऊ. भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु, असंही पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही एकत्र होतो, आहोत आणि राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्रात सक्षम सरकार बनावं यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. बहुमताचा आकडा तिन्ही पक्षांकडे होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदारसंख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचंही समजलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post