नगर : खासदार विखेंनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर


एएमसी मिरर : नगर 
शहर व उपनगर परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने खासदार सुजय विखे यांनी सोमवारी (दि.11) महापालिकेत बैठक घेऊन महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. 10 कोटींच्या निधीतून विविध कामे प्रस्तावित आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या या कामांमधील तांत्रिक अडचणी दोन दिवसांत दूर करुन कामे तत्काळ सुरू करावीत, अशी तंबीही त्यांनी अधिकार्‍यांना दिली आहे. येत्या गुरुवारी (दि.14) या संदर्भात पुन्हा बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार विखे व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राऊत, उपायुक्त प्रदीप पठारे, सुनील पवार, स्थायी समिती सभापती मुदस्सर शेख, धनंजय जाधव आदींसह नगरसेवक, मनपाचे विभागप्रमुख उपस्थित होते. दिल्लीगेट रस्त्याच्या कामाला आणखी गती द्यावी. येत्या दोन दिवसांत नियोजन करुन किती दिवसांत काम पूर्ण होईल, याची माहिती सादर करावी, अशा सूचना त्यांनी ठेकेदार रसिक कोठारी यांना दिल्या.
शासनाने दिलेल्या 10 कोटींच्या निधीतून शहरातील अनेक रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, कार्यारंभ आदेश देऊन सहा महिने लोटले तरी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. यावरुन विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना खडसावले. ठेकेदारावर कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी केला. ठेकेदार कोठारी बैठकीत उपस्थित झाल्यानंतर त्यांनी रस्त्यांच्या कामांबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी निदर्शनास आणल्या. जिथे रस्ताच चार फुटांचा आहे, तिथे पाच फूट रस्त्याचे काम प्रस्तावित आहे. अंदाजपत्रकात बीबीएम व कारपेट मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्ष खडीकरण केल्याशिवाय ही कामे करता येऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढीव कामांबाबतचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दोन दिवसांत या रस्त्यांची पाहणी करुन रस्त्याची लांबी-रुंदी काही प्रमाणात कमी करुन तोडगा काढता आला, तर तसा निर्णय घ्यावा. गुरुवारी या संदर्भात बैठक घेण्यात येईल. त्यात या विषयावर तोडगा काढून तत्काळ कामे सुरू करावीत. 10 कोटींच्या कामांमधील प्रलंबित असलेली निविदा मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त निधीबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे विखे यांनी सांगितले. तोडगा काढल्यानंतर कामांना सुरुवात झाली नाही, तर मी स्वतः ठेकेदाराच्या कार्यालयात जाईल व त्यावेळी काय परिस्थिती निर्माण होईल, याला मी जबाबदार राहणार नाही, असा इशाराही विखे यांनी दिला.

जादा दराने निविदा मंजूर केल्याच कशा?
शासनाने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकीय दरापेक्षा वाढीव 16 टक्के दराने निविदा मंजूर केल्याच कशा? असा सवाल खासदार विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केला. अनेक ठिकाणी शासनाच्या कामांच्या निविदा 10 ते 15 टक्के कमी दराने मंजूर होत आहेत. किमान अंदाजपत्रकीय दराने निविदा मंजूर होणे अपेक्षित आहे. असे असतांना जादा दराने निविदा मंजूर केल्याच कशा? निधी असतांनाही सहा महिने होऊनही कामे ठप्प होतात कशी? मनपापेक्षा पीडब्ल्यूडीचा कारभार वाईट दिसतोय, असेही ते म्हणाले.

महामार्गांच्या दुरुस्तीबाबत तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातून जाणार्‍या रस्त्यासह विळद परिसरातही खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी निधी आहे. मात्र, तांत्रिक अडचणी असल्याने बांधकाम विभागाचे नाशिक विभागीय मुख्य अभियंत्यांना बुधवारी (दि.13) नगरमध्ये बोलावले आहे. त्यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येणार्‍या खर्चाची तरतूद करुन त्याला मंजुरी घेतली जाईल व काम मार्गी लावले जाईल, असे विखे यांनी सांगितले.

शहरातील सर्व डीपी रस्त्यांचा प्रस्ताव करा!
नगर शहरात महापालिका हद्दीत मंजूर असलेले डीपी रस्ते अद्यापही ताब्यात का घेण्यात आले नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदरचे रस्ते ताब्यात घेण्यासाठी तत्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या दोन दिवसांत या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिध्द करुन भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली जाईल, असे नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्याच्या कामांसाठी 100 ते 150 कोटींचा निधी आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेला व महापौर वाकळेंना सहकार्य करेल, असे आश्वासनही विखे यांनी दिले.

रस्त्याच्या कामांची अंदाजपत्रकेच चुकीची!
बैठकीदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांच्या आवश्यक असलेल्या कामांचा अंतर्भाव अंदाजपत्रकात नसल्याचे समोर आले. यावरुनही महापौर वाकळे व खासदार विखे यांनी अधिकार्‍यांना जाब विचारला. सदरची अंदाजपत्रके जयप्रयाग इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी संस्थेने केली असल्याचे सांगत मनपा अधिकार्‍यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासगी संस्थेने केली असली तरी शासनाकडे सादर करण्यापूर्वी मनपा अभियंत्यांचे तपासून घेण्याचे काम नाही का? असा सवाल करत त्यांनी कानउघडणी केली.

‘जीवन प्राधिकरण’ म्हणजे महाराष्ट्राला शाप!
शहरातील इतर रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबतही विखे यांनी आढावा घेतला. यात भुयारी गटारीच्या कामाची अडचण समोर करण्यात आली. योजनेचे काम ठप्प असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाईपची रुंदी बदलून नवीन डीपीआर होणार असल्याचे विखे यांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यावर डीपीआर कुणी केला असा सवाल विखेंनी केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून डीपीआर झाल्याचे सांगताच विखेंनी डोक्याला हात लावला. जीवन प्राधिकरण हा महाराष्ट्राला मोठा शाप असल्याच्या शब्दांत त्यांनी या विभागाच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ठेकेदार कोठारींना घेरण्याचा प्रयत्न फसला!
बैठकीदरम्यान रखडलेल्या कामांवरुन ठेकेदार रसिक कोठारी यांना घेरण्याची पूर्ण तयारी उपस्थितांनी केली होती. मात्र, तांत्रिक कामांची अडचण पुढे करत कोठारी यांनी ‘पीडब्ल्युडी’च्या कोर्टात चेंडू टोलवला. अडचणीतून मार्ग काढल्यास एकाच दिवसांत सगळ्या रस्त्यांची कामे सुरू करु, असे त्यांनी सांगितले. तसेच भाजप नगरसेविकेचे पुत्र सतीश शिंदे यांनी नाट्यगृहाचे काम रखडल्याकडे विखे यांचे लक्ष वेधत कोठारी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वर्षे कामाला निधीच उपलब्ध नव्हता. निधी उपलब्ध झाल्यावर काही प्रमाणात काम सुरू केलेय. कामाचे डिझाईनच अद्याप मिळालेले नसल्याने काम रखडले असल्याचे सांगत मी व महापौरांनी स्वतः 25-25 हजार रुपये डिझाईनसाठी दिल्याचा दाखला त्यांनी दिला. त्यावर शिंदे यांची बोलती बंद झाली.

Post a Comment

Previous Post Next Post