'काळजी करू नका, भाजपा-सेनाच सरकार स्थापन करेल'


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसलेली असताना केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. “राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. भाजपा-शिवसेना राज्यात सरकार स्थापन करेल, असं शाह यांनी सांगितल्याचा दावा आठवले यांनी केला आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रिय मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. यानंतर युती केवळ औपचारिकता असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यात शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर पडल्याची घोषणा केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. आता शिवसेना विरोधी बाकांवर बसणार असताना केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सत्तास्थापनेबद्दल गौप्यस्फोट केला आहे. “तुम्ही मध्यस्थी केली तर एखादा मार्ग निघू शकतो, असं आपण अमित शाह यांना बोललो. त्यावर ते म्हणाले की, काळजी करू नका. सर्वकाही ठिक होईल. भाजपा आणि शिवसेना सरकार स्थापन करण्यासाठी एकत्र येतील, अस त्यांनी सांगितल्याची माहिती आठवले यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post