पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल : अशोक चव्हाण


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करणार असेल तर काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची बदललेली परिस्थिती पाहता पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यात अभूतपूर्व अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. खरं तर भाजपाने सरकार स्थापन करणं अपेक्षित होतं. परंतु बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता आता राज्यपालांना दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावावं लागेल. परंतु, शिवसेनेला स्वबळावर सत्तास्थापन करणे अजिबात शक्य नाही. सध्या आम्ही सर्वजण जयपूरमध्ये आहोत, या ठिकाणी काँग्रेसचे सर्व पक्षश्रेष्ठी आहेत. या ठिकाणी राज्यातील बदललेल्या परिस्थितीचा विचार करून व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे.
काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, यावर बोलताना चव्हाण यांनी सांगितलं की, काही व्यक्तिगत मतं असू शकतात मात्र व्यक्तिगत भूमिका म्हणजे काही पक्षाची भूमिका नसते. शेवटी सारासार विचार करूनच पक्षाला राजकीय निर्णय घ्यावा लागत असतो. काहीही झाले तरी भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आताच्या परिस्थितीत नेमकं पुढे काय करावं लागेल, हा धोरणात्मक निर्णय आहे. तसेच, राष्ट्रवादीबरोबर आमची आघाडी आहेच, त्यामुळे काँग्रेसला कुठलाही निर्णय़ घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post