देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे सरकारवर बरसले


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाचं आजचं कामकाज हे पूर्णपणे संविधानाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने रेटून करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नाही अशी टीका केली आहे. भाजपा आमदारांनी सभात्याग केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. बहुमत चाचणी आज पार पडली असून यावेळी उद्धव ठाकरे सरकारने बहुमत सिद्ध केलं. १६९ आमदारांनी उद्धव ठाकरे सरकारला समर्थन दिलं. तर चार आमदारांनी यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. भाजपाने हे अधिवेशन बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. यावेळी दादागिरी नही चलेगी अशी घोषणाबाजीदेखील करण्यात आली.
आज बोलावण्यात आलेली बैठक नियमाला धरुन नाही. नवीन अधिवेशन बोलावण्यासाठी समन्स काढण्याची गरज होती. समन्स काढण्यात न आल्याने हे अधिवेशन बेकायदेशीर आहे. इतकंच नाही मंत्र्यांनी घेतलेली शपथही अवैध आहे. हंगामी अध्यक्षांनी चुकीच्या पद्धतीनं हटवण्यात आलं. तिन्ही पक्ष मिळून संविधानाची पायमल्ली करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभेत अध्यक्षांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत बहुमत सिद्द करता येत नाही. आपलं सरकार पडेल या भीतीने तिन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणं टाळलं. आपल्या आमदारांवर त्यांचा विश्वास नाही. संविधान, लोकशाही आणि सर्वोच्च न्यायलयाचे आदेश सगळ्यांची पायमल्ली करण्यात आल्यानेच आम्ही सभात्याग केला आहे. हे कामकाज संविधानाला अनुसरुन नाही. याचं पत्र आम्ही राज्यपालांना देणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post