सरकार विश्वासदर्शक ठराव नक्कीच जिंकणार : आशिष शेलार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : भाजपाच्या विधीमंडळ गटाची बैठक दादर येथील वसंतस्मृती येथे आज पार पडली. या बैठकीबाबत भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार विश्वासदर्शक ठराव नक्कीच जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, आमदार बबनराव लोणीकर, आमदार बबनराव पाचपुते यांची उपस्थिती होती. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आगामी विश्वासदर्शक ठराव संपूर्ण बहुमताने संमत करेल, या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्व आमदारांनी संमंत केला. हे सरकार संपूर्ण पाच वर्षे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महायुतीला दिलेल्या जनादेशाचा अनादर शिवसेनेने केला असल्याचे मत सर्व आमदारांकडून मांडण्यात आले. तसेच ज्या विचारधारेच्या आधारावर युती टिकून होती, त्या विचाराला देखील शिवसेनेने तिलांजली दिली असल्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आला. भाजपाच्या आमदारांना कुठेही एकत्र ठेवण्याची गरज नाही. आमचा आमच्या आमदारांवर आणि नेत्यांवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या पक्षांना आपल्या आमदारांवर विश्वास नाही, तेच आपल्या आमदारांना डांबून ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Post a Comment

Previous Post Next Post