महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला नगरसेवक फुटण्याची भिती!


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाशिवआघाडी आकाराला येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष या महाशिवआघाडीमध्ये आहेत. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महाशिवआघाडीच्या हालचाली सुरु आहेत. त्यांनी किमान समान कार्यक्रमाची आखणी सुद्धा केली आहे. या महाशिवआघाडीकडून भाजपाला नाशिकमध्ये पहिला धक्का मिळू शकतो. म्हणूनच भाजपाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी सहलीसाठी पाठवले आहे.
नाशिक महापालिकेत भाजपाकडे बहुमत आहे. पण इथे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाला महाशिवआघाडीकडून झटका मिळू शकतो. नाशिकमध्ये २२ नोव्हेंबरला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता भाजपाकडे सर्वाधिक ६५ नगरसेवक आहेत. महायुती एकत्र असताना नाशिकमध्ये भाजपाला कुठलाही धोका नव्हता. पण शिवसेनेने आता भाजपाची साथ सोडली आहे. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडण्याची आता फक्त औपचारिकताच उरली आहे.
सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडे ३४, काँग्रेस-राष्ट्रवादी १२, मनसेचे पाच, अपक्ष तीन, रिपाई आठवले गटाचा एक या सर्व नगरसेवकांची एकत्रित संख्या ५५ आहे. भाजपाच्या सात नगरसेवकांनी सहलीला जाण्यास नकार दिल्याने भाजपाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. त्यात आणखी काही नगरसेवक फुटले तर महापौरपदाच्या निवडणुकीत धक्का बसू शकतो.
म्हणून भाजपाने सर्व नगरसेवकांना सहलीला पाठवले आहे. भाजपाच्या ज्या सात नगरसेवकांनी नकार दिला ते माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक समजले जातात. सानप यांना भाजपाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली होती.

Post a Comment

Previous Post Next Post