'आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत पुरावे द्यावेत'




एएमसी मिरर : वेब न्यूज
भारतीय जनता पार्टीवर आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्याऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच असा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने ४८ तासांत याचे पुरावेही सादर करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. आमच्यावर होत असलेला आमदार खरेदी-विक्रीचा आरोप खोटा आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने येत्या ४८ तासांत पुरावे द्यावेत. आम्ही कोणालाही फोन केलेला नाही. मात्र तुमचा आरोप असेल तर आपल्या फोनमधील या संभाषणाचे रेकॉर्ड काढावे आणि सादर करावे, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.
मुनगंटीवार म्हणाले, जे शिवसेनेचे आमदार १५ वर्षे सत्ता नसतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर ठाम राहिले, ते आत्ता कसे फुटतील? शिवसेनेने आपले आमदार फुटतील या भीतीने नव्हे तर दुसऱ्याच कुठल्यातरी कारणासाठी त्यांना हॉटेलवर नेऊन ठेवले आहे. भाजपा कुठल्याही आमदाराच्या संपर्कात नाही. भाजापा विचाराच्या लाढाईवर काम करीत आली असून यापुढेही राहिल.
सत्ता-स्थापनेबाबतची कोंडी फुटेल असा मला विश्वास आहे. जनतेने महायुतीला जो जनादेश दिला आहे त्याचा आम्ही आदर करतो. शिवसेनेने असं कधीही म्हटलं नाही की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चाललो आहोत. त्यामुळे कधीतरी चर्चेतून तोडगा निघेल आणि गोड बातमी येईलच, त्यासाठी वेट ॲण्ड वॉच, असेही यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post