फडणवीस सरकार गडगडले! मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा दिला आहे. त्यामुळे बहुमत चाचणी पूर्वीच ७८ तासातच सरकार गडगडले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सोपविला. आता नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहेत.
पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.
जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असा आरोप त्यांनी केला.
आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खा घोड्याचा तबेला उभा केला, असेही फडणवीस म्हणाले. महाविकासआघाडीचं तीन चाकं असलेलं सरकार चालणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला, शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता, असे म्हणत फडणवीस यांनी पाच वर्ष साथ दिल्याबद्दल शिवसेनेसह सर्व अधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post