एएमसी मिरर : वेब न्यूज
विधानसभेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 नोव्हेंबर रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होईल. राज्यपालांनी राजीनामा स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज पाहण्यास ते सांगू शकतात, असे म्हटले जात आहे.
तेराव्या विधानसभेचा कालावधी शनिवारी मध्यरात्री 12 वाजता संपुष्टात येत आहे. विद्यमान विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्री राजीनामा सादर करू शकतात. राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल त्यांना काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहण्यास सांगू शकतात, असे सांगण्यात येते.
सत्तास्थापनेसाठी भाजपला अजूनही बहुमताचा दावा करता आलेला नाही. त्यामुळे पुढील विधानसभेत आपणच मुख्यमंत्रीपदावर राहू याची शाश्वती नसल्याने मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राज्यपालांकडे राजीनामा सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.