महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम ठरला


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे, तत्पूर्वी तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला आहे. पत्रकार परिषदेद्वारे याबद्दल माहिती देण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची याप्रसंगी उपस्थिती होती. शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच, राज्याला एक स्थिर सरकार देऊ असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. ही आघाडी या देशातील राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे प्रतिबिंब असेल, असे यावेळी सांगण्यात आले.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातला प्रत्येक निर्णय हा घटनेच्या प्रास्ताविकाला धरून असेल, ही महाविकास आघाडी राज्यातील जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असेल, आघाडीच्या प्रत्येक निर्णयात भारतीय संविधानाने सांगितलेले मूल्य आणि तत्व केंद्रस्थानी असतील, या आघाडीचा मुख्य कार्यक्रम महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेऊन, महाविकासआघाडीचे निर्णय समाजातील सर्व घटकांसाठी समान असणार आहेत. यामध्ये भाषा, जात, धर्म असा कुठलाही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही.
याचबरोबर आज राज्यात वाढलेली बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची सुरू असलेली घसरण यामुळे जनतेत जो काही अंसतोष आहे. हे पाहता महाविकासआघाडी राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. ही आघाडी या देशातील राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचे प्रतिबिंब असेल. कोणालाही भीती वाटणार नाही, कोणालाही झुकतं माप दिलं जाणार नाही. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, हाच आमचा अजेंडा असणार आहे. या किमान समान कार्यक्रमात शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, लघु उद्योजक, छोटेमोठे उद्योजक शिक्षण, आरोग्य आणि रोजगार सर्व जाती-धर्म, सर्व घटक यांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज शेतकरी, सर्वसामान्य माणूस संकटात आहे, त्यामुळे त्यांना हे आपलं सरकार वाटलं पाहिजे, या आधारावर हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या स्वाक्षरीनिशी आणि त्यांच्या मान्यतेने हा किमान समान कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. येणारं आमचं सरकार हे अतिशय मजबूत असणार आहे. या राज्याला स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बहुमतापेक्षा कितीतरी जास्त संख्याबळ महाविकासआघाडीकडे आहे, असं देखील शिंदे यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना, आम्ही आमच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं, ते कर्जमाफीचं आहे. कर्जमाफीबद्दल सत्तास्थापन केल्यानंतर व विश्वासदर्शक ठराव झाल्यानंतर याच्यावर आम्ही काम करू. त्याचा तपशील आम्ही तुमच्यासमोर मांडणार असल्याचे सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी, आज महाविकासआघाडीचे सरकार राज्यात येत आहे, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे काही मंत्री देखील यावेळी शपथ घेत आहेत. आम्ही तीन पक्ष एकत्र आलो व आमचे मित्रपक्ष एकत्र आहेत. आम्ही सर्वजण एकत्र येत असताना एक किमान समान कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. याचं सूत्र भारतीय संविधानांच जे प्रास्ताविक आहे, त्यातील तत्व आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी असणार असल्याचे सांगितलं. तसेच, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक आदी सर्वांना बरोबर घेऊन सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आमचं सरकार काम करणार आहे. सर्व जाती-धर्मांना सर्वांना न्याय देणारं आमचं सरकार असणार आहे. त्यानुसार हा किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर आणखी काही गोष्टींचा समावेश होऊ शकतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एक चांगल सरकार आम्ही या राज्याला देणार आहोत, असे देखील ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post