लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील : थोरात


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे एकत्रित सरकार तयार करून ते पाच वर्षे व्यवस्थित चालवयाचे आहे. त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आम्ही तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून यावर तोडगा काढून लवकरात लवकर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
ते संगमनेर येथे बोलत होते. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे एकत्रित सरकार राज्यात स्थापन होण्यास विलंब का लागत आहे, असे माध्यम प्रतिनिधींनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ बाळासाहेब थोरात यांना विचारले असता, ते म्हणाले की, तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम तयार करायचा आहे. तो आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून शांततेत करणार आहोत. त्या संदर्भात तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या दिल्लीत दोन ते तीन महत्वाच्या बैठका होणार आहेत. त्या बैठकीत जे काही होईल ते व्यवस्थित होईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
आगामी होणा-या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तीन पक्ष एकत्रित येतील का?, असा सवाल केल्यानंतर आ. थोरात म्हणाले की, आपण अद्याप कुणालाही सूचना दिलेल्या नाहीत. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये त्या चर्चा होताना दिसत असल्या तरी भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी हा प्रयोग केला जाणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अनेक घडामोडी चालू आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात उमेदवारांचा झालेला खर्च दाखल करण्याचे आदेश निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे सर्वच नेते आपआपल्या मतदार संघात गेले आहेत. मी सुद्धा आलो असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post