एएमसी मिरर : वेब न्यूज
आमचे आमदार फोडण्यासाठी भाजपाकडून फोनाफोनी सुरू असून आमदारांना विविध प्रलोभने दाखवली जात असल्याचा  आरोप कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी केला आहे. आमचे आमदार कधीच फुटणार नाहीत, असा दावाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत फुटाफूट व्हायची होती ती निवडणुकीआधीच झाली. आता नवीन आमदार हे जनतेच्या विश्वासाला पूर्णपणे पात्र ठरलेले असल्याने ते फुटणार नाहीत, असा दावा पाटील यांनी केला. ‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्याना अद्याप सत्ता स्थापन करणे शक्य न झाल्याने ते विरोधकांचे आमदार फुटत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत. यापुढे कोणत्याही पक्षातील आमदार फुटला, तर सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदाराला पराभूत करतील, असा इशाराही पाटील यांनी दिला.
कितीही प्रयत्न झाले तरी काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आता फोन येताहेत. पण येत्या काळात बळजबरी, धमकावणे, असेही प्रकार घडू शकतात, अशी शक्यता काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. भाजपाने अद्याप सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली तर त्या पापाचे प्रायश्चित्त भाजपाला घ्यावे लागेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. फोडाफोडीच्या भीतीने काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून उद्या त्यांना जयपूरला हलविणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.