काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक अचानक रद्द; राजकीय तर्क-वितर्क सुरु


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये होणारी समन्वय समितीची बैठक अचानक रद्द झाल्याचे वृत्त आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. सर्व महत्वाचे नेते शरद पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे बैठकीला उपस्थित असताना अजित पवार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले. तसेच आपण बारामतीकडे निघालो आहोत, असे त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
या समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे नेते उपस्थित होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी घेरल्यानंतर बैठक रद्द झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नंतर बैठक कधी होईल हे आपण सांगू शकत नाही असे सांगताना अधिक माहिती न देता नो कमेंट्स असे शब्दही त्यांनी उच्चारले. यावेळी अजित पवार नेहमीसारखे सामान्य वाटले नाहीत तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव रागात असल्यासारखे होते.
त्याचबरोबर सुनील तटकरे यांनी देखील बैठक रद्द का झाली, याची आपल्याला कल्पना नसल्याचे म्हटले आहे. मी शेवटच्या क्षणी बैठकीसाठी आलो त्यामुळे मला याची माहिती नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, अमित शाह यांनी पहिल्यांदाच राज्यातील सत्तापेचावर केलेल्या विधानावर भाष्य करण्यासही तटकरे यांनी नकार दिला.
Post a Comment

Previous Post Next Post