फडणवीस यांच्या नावावर असेही विक्रम!


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंगळवारचा दिवस मोठा राजकीय भूकंप घेऊन आला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा, तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे तत्कालिन गटनेते अजित पवार आणि आमदारांचा पाठिंबा घेऊन स्थापन झालेले भाजप सरकार अवघ्या ७८ तासांमध्ये कोसळले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काही विक्रमही जमा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांना एकाच महिन्यामध्ये दोनदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकदा त्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर असताना राजीनामा दिला, तर दुसऱ्यांदा सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर असताना राजीनामा दिला. फडणवीस यांनी अल्पजीवी ठरलेल्या सरकारचे चार दिवस (23 नोव्हेंबर, 2019 ते 26 नोव्हेंबर, 2019) नेतृत्व केले. फडणवीस यांच्याआधी सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम काँग्रेसच्या पी.के. सावंत यांच्या नावावर होता. त्यांनी 24 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 असे 10 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
याआधी महाराष्ट्रात शनिवारी मोठा राजकीय उलटफेर झाला. सकाळी 7:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस राज्याचे 28 वे मुख्यमंत्री बनले. राज्यातील 52 वर्षांच्या इतिहासात पाच वर्ष पूर्ण करून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे फडणवीस हे दुसरेच मुख्यमंत्री ठरले.

वसंतराव नाईक दुसरा कार्यकाळ सांभाळणारे पहिले मुख्यमंत्री होते
देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी काँग्रेसचे नेते वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचे पाच वर्ष पूर्ण करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले होते. 1963 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. 1967 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा पुन्हा 13 मार्च 1972 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. परंतु 1975 मध्ये आणीबाणी काळात त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आणि शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री बनले.

दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये राज्याचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री बनले होते. तेव्हा ते 44 वर्षांचे होते. शरद पवार वयाच्या 38 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले होते.

Post a Comment

Previous Post Next Post