डॉक्टर तरुणीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळलं, देशभरात संतापाची लाट


एएमसी मिरर वेब टीम
हैदराबाद : येथील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरवर बलात्कार करुन जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. डॉ. प्रियांका रेड्डी असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होतोय. जंगली प्राण्यांनाही लाज वाटेल असे हे कृत्य आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया दाक्षिणात्य कलाकारांनी दिली आहे. हैदराबाद पोलीस याप्रकरणी तपास करत असून पोलिसांनी आरोपी मोहम्मद आरीफ आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
26 वर्षीय प्रियंका ही हैदराबादमधील सरकारी पशू वैद्यकीय रुग्णालयात काम करत होती. प्रियंका नेहमीप्रमाणे तिचं रुग्णालयातलं आपलं काम संपवून घरी निघाली होती. रस्त्यात तिची गाडी पंक्चर झाली. त्यानंतर तिला एका व्यक्तिने गॅरेजपर्यंत लिफ्ट दिली. गॅरेजजवळ खूप ट्रक ड्रायव्हर्स होते. तिने बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितले की, "काही लोकांनी तिची गाडी ताब्यात घेतली आहे. आम्ही पंक्चर काढून देऊ चल असं तिला म्हणत आहेत, मला टेन्शन आलंय.." एवढं बोलून होईपर्यंत तिचा फोन कट झाला.
फोन कट झाल्यामुळे तिची बहीण घाबरली. तिने आणि तिच्या काही नातेवाईकांनी तिची शोधाशोध सुरु केली. ती कुठेच सापडली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिचा पूर्णपणे जळलेला मृतदेह मिळाला. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. नराधमांनी प्रियांकाचा मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने जाळला की तिची ओळख फक्त तिच्या स्कार्फ आणि लॉकेटवरुन पटली.
आधी निर्भया, मग कठुआ बलात्कार आणि आता प्रियंका रेड्डी बलात्कार. दरवर्षी अशा अनेक घटना समोर येतात आणि दरवर्षी महिला सुरक्षेचा प्रश्न दिल्ली पासून गल्लीपर्यंत उठतो. परंतु देशातल्या बलात्काराच्या घटना अद्याप कमी झालेल्या नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post