बाळासाहेबांना वंदन करुन, आनंद दिघेंचे स्मरण करुन मी शपथ घेतो की..


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकारचे नेते म्हणून निवड झालेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी उद्धव यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. उद्धव यांच्याबरोबरच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि पक्षाचे गटनेते तसेच ठाण्यामधील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार एकनाथ शिंदे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना शिवसेनापक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा आवर्जून उल्लेख केला.
महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी शिवाजीपार्कवर मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
शपथ घेण्यासाठी मंचावर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना आपल्या आई-वडीलांबरोबरच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचेही नाव घेतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन, धर्मवीर आनंद दिघेसाहेबांचे स्मरण करुन, आई-वडीलांच्या पुण्याईने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसाहेब यांच्या आशिर्वादाने, मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की… असं म्हणत त्यांनी शपथ घेतली.
शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा सर्वात मोठा नेता म्हणून शिंदे यांची ओळख आहे. शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडण्यामध्ये आनंद दिघे यांचा मोलाचा वाटा होता. शिंदे हे दिघेंना आपला राजकीय गुरु मानतात. आनंद दिघे यांच्या निधनानंतर ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. नारायण राणे व राज ठाकरे पक्षातून बाहेर पडल्यावर ठाणे जिल्हय़ाच्या किल्ल्याला भगदाड पडू नये म्हणनू ‘मातोश्री’ने शिंदे यांना ताकद दिली. शिंदे यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post