'त्या' निवडणूक आयुक्तांची होणार चौकशी!
एएमसी मिरर : वेब न्यूज
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात त्यांना नंतर निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट देण्यात आली. परंतु निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी त्यांच्या क्लीन चीटला विरोध केला होता. दरम्यान, निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी त्यांच्या उर्जा खात्यातील २००९ ते २०१३ या कार्यकाळात आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे आढळले होते का? याचा तपास तपासण्याचा आदेश केंद्र सरकारने ११ सरकारी कंपन्यांना दिला आहे. केंद्र सरकारनं २९ ऑगस्ट रोजी यासंदर्भातील एक गोपनीय पत्र पाठवलं आहे. ऊर्जा सचिवांच्या मान्यतेनंतर सरकारी कंपन्यांच्या सर्व मुख्य दक्षता अधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे.
ज्येष्ठ आयएएस अधिकारी अशोक लवासा यांनी २००९ ते २०१३ या आपल्या कार्यकाळादरम्यान आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. तसंच त्यांनी काही सहयोगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे. या पत्रासोबत ऊर्जा मंत्रालयानं १४ कंपन्यांची एक यादीही सादर केली आहे. या कंपन्या ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहेत. त्या कंपन्यांमध्ये अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल लवासा या संचालक पदावर कार्यरत होत्या. इंडियन एक्स्प्रेसनं यांसंदर्भातील वृत्त दिलं आहे.
या पत्रामध्ये निरनिराळ्या सरकारी कंपन्या आणि राज्य सरकारांद्वारे A2Z समूहाच्या कंपन्यांना देण्यात आलेल्या १३५ प्रकल्पांची माहितीही देण्यात आली आहे. तसंच यात नोवल लवासा यांना ४५.८ लाख रूपये देण्यात आल्याचंही नमूद केलं आहे. याव्यतिरिक्त यामध्ये आणखी एक यादी जोडण्यात आली आहे. त्यामध्ये १३ मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करण्यात आला आहे. २००९ ते २०११ दरम्यान निरनिराळ्या राज्य सरकारांनी A2Z वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडला दिलेल्या मोठ्या प्रकल्पांची यादीही सोबत जोडण्यात आली आहे.
सध्या माझ्याकडे यासंदर्भात बोलण्यासाठी काहीही नसून याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं लवासा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात पाच तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांना क्लीन चीट देण्यात आली होती. परंतु त्या क्लीन चीटला लवासा यांनी विरोध केला होता, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं प्रकाशित केलं होतं. तसंच लवासा यांच्या पत्नीसह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आयकर विभागाच्या तपासाच्या कक्षेत असल्याचं वृत्तही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यांच्यावर संपत्तीची माहिती न देणं तसंच बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच अशोक लवासा यांचा मुलगा अबीर लवासा यांची कंपनी नॉरिश ऑर्गेनिक आणि त्यांनी बहिण डॉ. शकुंतला लवासा यांना यापूर्वीच आयकर विभागाची नोटीस पाठवण्यात आली असून त्या प्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे.Post a Comment

Previous Post Next Post