मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणं हा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केला. यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५ हजार कोटींचे कर्ज मेट्रो प्रकल्पासाठी दिलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणं हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही हेच यातून दिसून येते असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरे कारशेडला स्थगिती दिली आहे. आरे कारशेडमध्ये झालेल्या वृक्षतोडीवरुन शिवसेनेने भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. तसंच आमचं सरकार आलं तर आम्ही आरेला जंगल घोषित करणार असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आणि तो आरे संदर्भातलाच होता.
आरे कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेताच भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आशिष शेलार यांनीही खोचक शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post