महामार्गावरुन प्रवास करताना 'फास्टटॅग' अनिवार्य, एक डिसेंबरपासून अंमलबजावणीएएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे अनिवार्य आहे. टोल नाक्यावर 1 डिसेंबरपासून रोख रक्कमेच्या माध्यमातून टोल स्वीकारला जाणार नाही. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टटॅग बसवून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.
फास्टटॅग यंत्रणा सर्व टोलनाक्यावर उपलब्ध आहे. भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस, आयडीएफसी आदी बँक शाखेत विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर फास्ट टॅग ऑनलाईन पर्चेस पोर्टलवरही उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोअरवर 'माय फास्टटॅग' ॲप्लिकेशन उपलब्ध आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2016 पासून फास्टटॅग इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टीम सुरु केली आहे. त्यानुसार 7 मे 2018 रोजी केंद्र सरकारने याबाबतचे राजपत्रही जाहीर केले आहे. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात येत आहे.

फास्टटॅग काय आहे ?
फास्टटॅग एक पातळ इलेक्ट्रॉनिक चिप आहे. ही चिप गाडीच्या पुढच्या काचेवर चिटकवण्यात येणार आहे. चिप निश्चित केलेल्या रक्कमेला खरेदी करता येईल. ही चिप ग्राहकांच्या बँक खात्याला जोडता येते.

फास्टटॅग कसे काम करते?
फास्टटॅग चिकटवलेले वाहन टोल नाक्यावरुन पुढे जाईल त्यावेळेस निश्चित केलेला टोल वाहनधारकाच्या फास्टटॅग खात्यामधून वजा होणार आहे. फास्टटॅग स्कॅन कऱण्यासाठी टोल नाक्यावर विशेष उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे फास्टटॅग चिप ओळखली जाईल. चिप स्कॅन झाल्यावर टोल नाक्यावरील बूम आपोआप उघडले जाणार आहे.

फास्टटॅग वापरण्याचे फायदे
फास्टटॅगच्या वापरामुळे वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. याबाबत ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकता यांनी सविस्तर अभ्यास केला आहे. त्यानुसार दरवर्षी देशभरात 87 हजार कोटी रुपयांची बचत होईल. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post