अमदनगर : राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

विनापरवाना लावण्यात आलेला फलक.

एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर डीएसपी चौकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनाधिकृत होर्ल्डिंग लावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान यांच्यासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर महापालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
डीएसपी चौकामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत शासकीय निवासस्थाने आहेत. या निवासस्थानकातील चौकात लोखंडी बोर्डवर समद खान आणि मोहसीन शेख यांचे फोटो आणि त्याखाली शुभेच्छुक म्हणून मुजिब खान असा फलक लावण्यात आला आहेे. प्रभाग अधिकारी अशोक साबळे हे दि.27 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रभागाची दैनंदिन पाहणी करत असताना विनापरवाना बेकायदेशीररित्या वाढदिवसाचा शुभेच्छा फलक लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या फलकासाठी महापालिकेकडे कोणतीही परवानगी घेतली नसल्याने साबळे यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम 3 नुसार समद खान वहाब खान, मोहसीन रफीक शेख, मुजिब अजीज खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post