सांगोल्याजवळ अपघातात पाच वारकरी ठार


एएमसी मिरर : वेब न्यूज
कार्तिकी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या बोलेरो वाहनाला अपघात होऊन बेळगाव तालुक्यातील मंडोळी येथील पाच वारकरी ठार झाले. तर चारजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास मांजरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे हा अपघात घडला. पंढरपूरपासून २० किलोमीटर जवळ आल्यानंतर पिकअप आणि ट्रॅक्टरच्या धडकेत हा भीषण अपघात घडला. तर मंडोळी हे ठिकाण बेळगावपासून ७ किलोमीटर अंतरावर आहे.
मंडोळी (ता. बेळगाव) बसवाण गल्ली येथील दहा ते बारा वारकरी कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरला चालले होते. मंडोळी येथून गुरुवारी रात्री निघालेले बोलेरो वाहन आज सांगोला जवळ पोहोचले. यावेळी समोरुन विटा भरलेला ट्रॅक्टर जात होता. पहाटेची वेळ असल्याने वाहन चालकाचे बोलेरो वरील नियंत्रण सुटले व वाहन समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडकले. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनातील चौघे जण जागीच ठार झाले, तर एकाचा उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.
कृष्णा वामन कणबरकर (वय ४६,) यल्लाप्पा देवाप्पा पाटील चालक (वय ३७ ), अरुण दत्तात्रय मुतकेकर (वय ३४), लक्ष्मण परसराम आंबेवाडीकर ( वय ४६), व महादेव मल्लाप्पा कणबरकर ( वय ४०, सर्व राहणार मंडोळी, जि. बेळगाव) हे पाच जण जागीच ठार झाले आहेत. गणपत यल्लाप्पा दळवी (वय ७०,) तमन्ना नारायण साळवी (वय ४८), गुंडू विठ्ठल तरळे (वय ७२), परसराम गणपत दळवी (वय ३२) या चार जखमींवर पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.
Post a Comment

Previous Post Next Post