शिवसेनेला समर्थन देण्यावरून आघाडीतच जुंपली


एएमसी मिरर : वेब न्यूज
निवडणुकीचे निकाल लागून तीन आठवड्यांचा कालावधी उलटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजपानं नकार दिल्यानंतर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. परंतु २४ तासांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या समर्थनाचं पत्र त्यांना सादर करता आलं नाही. झालेल्या उशीरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे उशीर होत असल्याचं म्हटलं. तर अजित पवार यांनी काँग्रेसमुळे समर्थन देता आलं नसल्याचं म्हटलं.
राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीत आमदारांच्या समर्थनाचं पत्र सादर करता आलं नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे. परंतु पत्र देण्यावरूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रानं काहीही झालं नसतं. आम्हीदेखील काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढल्यानं दोघांनीही एकत्र हा निर्णय घेणं अपेक्षित होतं. काँग्रेसचे आमदार सध्या जयपूरला असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचण येत आहे. काँग्रेस सोबत आली तरच यातून काही मार्ग निघू शकतो, असं पवार यावेळी म्हणाले.
तर दसुरीकडे शरद पवार यांच्या सांगण्यामुळेच एक दिवस पुढे ढकलला असल्याची प्रतिक्रिया माणिकराव ठाकरे यांनी दिली. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. १८ दिवसांनंतरही राज्यात अद्याप सरकार स्थापन होऊ शकलं नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post