भाजपाला राज्यपालांकडून सत्तास्थापनेचे निमंत्रण


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे.
भाजपची रविवारी कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत हे निमंत्रण स्वीकारायचे की नाही याबाबत निर्णय होणार असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
१३व्या विधानसभेची मुदत शनिवारी मध्यरात्री संपुष्टात येणार असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सादर केला होता. तर राज्यपालांनी पुढील व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना फडणवीस यांना केली होती.
राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेवर टीकास्त्र डागले. चर्चेची दारे शिवसेनेनेच बंद केली. अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी शिवसेनेचा दावा खोटा ठरवला. फडणवीस यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे आरोप फेटाळले होते.Post a Comment

Previous Post Next Post