उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या दादर येथील शिवाजी पार्कवर होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने बुधवारी या कार्यक्रमाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच संबंधितांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
या कार्यक्रमादरम्यान शिवाजी पार्कवर लाखोंच्या संख्येने गुरुवारी लोक जमा होतील. नेहमी शिवाजी पार्कवर अशा प्रकारचे सोहळे होत नाहीत. मात्र, सार्वजनिक मैदानांवर अशा सोहळ्यांचे पायंडे पाडू नका, असे सांगताना उद्या होणाऱ्या सोहळ्याच्या सुरक्षेबाबत खबरदारी घ्या असे आदेश हायकोर्टाने संबंधीत यंत्रणांना दिले आहेत. न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आय छागला यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. हे सांगताना कोर्ट उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीविरोधात नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे.
उद्याच्या सोहळ्याबाबत आम्हाला काहीही म्हणायचे नाही. मात्र, कोणतीही अप्रिय घटना घडू नये अशी आम्ही प्रार्थना करतो, असे कोर्टाने म्हटले आहे. विकॉम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने उद्याच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात याचिका दाखल करीत शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे की कार्यक्रमांचे? असा सवाल केला आहे. यावर सुनावणी करताना हायकोर्टाने ही चिंता व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post