ऑर्बिटरने पाठवला चंद्रावरील खड्डयाचा 3 D फोटो


एएमसी मिरर : वेब न्यूज
चंद्राच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या चांद्रयान-२ मधील ऑर्बिटरने चंद्रावरील खड्ड्याचा ३ डी फोटो पाठवला आहे. ऑर्बिटरमधील टीएमसी-२ कॅमेऱ्याने हा फोटो टीपला आहे. टीएमसी-२ म्हणजे टेरीयन मॅपिंग कॅमेरा. भारतीय अवकाश संधोधन संस्था इस्रोने हा फोटो टि्वट केला आहे.
चंद्रावरील लँडिंगमध्ये भारत अपयशी ठरला असला तरी चांद्रयान-२ मोहिम संपलेली नाही. चांद्रयान-२ मधील ऑर्बिटर चंद्रापासून १०० किलोमीटरच्या कक्षेत भ्रमण करत आहे. ऑर्बिटरचे कार्य व्यवस्थित सुरु आहे. ऑर्बिटर साडेसात वर्ष कार्यरत राहील असे इस्त्रोने सांगितले आहे. विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नसले तरी ऑर्बिटरच्या माध्यमातून अनेक गोष्टी शोधून काढता येतील असा दावा इस्रोचे अध्यक्ष सिवन यांनी केला होता. ऑर्बिटरमधील सर्व उपकरण व्यवस्थित कार्यरत आहेत.
नासाच्या ऑर्बिटरला दुसऱ्या प्रयत्नातही विक्रम लँडरला शोधून काढता आलेले नाही. नासाने चंद्रावर पाठवलेला ऑर्बिटर १४ ऑक्टोंबरला विक्रमच्या लँडिंग साइटवरुन गेला. नासाच्या एलआरओने लँडिंग साइटच्या जागेचे वेगवेगळे फोटो काढले. पण त्यानंतरही विक्रम लँडरचा शोध लागू शकलेला नाही. ७ सप्टेंबरला विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपेक्षित होते. पण अखेरच्या टप्प्यात लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरशी संपर्क होऊ शकलेला नाही.
विक्रम लँडर सावल्यांखाली झाकला गेल्यामुळे त्याचे स्पष्ट फोटो मिळत नसावेत असे नासाचे म्हणणे आहे. यापूर्वी १७ सप्टेंबरला एलआरओ ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साईटवरुन गेला होता. १७ सप्टेंबरला संधी प्रकाशाची वेळ असल्याने विक्रमच्या लँडिंग साइटचे स्पष्ट फोटो मिळू शकले नव्हते. त्यामुळे १४ ऑक्टोंबरला अपेक्षा होती. पण यावेळी सुद्धा ठोस पुरावे मिळू शकलेले नाहीत. १७ सप्टेंबरला चंद्रावर अंधार पडण्याची वेळ असल्याने सावलीमुळे विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता.

Post a Comment

Previous Post Next Post