'शरद पवारांच्या निर्णयाचा आदर ठेऊन परत या'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीच असल्याचं ट्विट करून सर्व राजकीय घडामोडींना नवं वळणं दिलं आहे. मात्र, त्यांच्या ट्विटला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “राज्याच्या हितासाठी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचा आदर ठेवून परत या,” असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहेे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार रविवारी सोशल मीडियावर सक्रीय झाले. शपथ घेतल्यानंतर अभिनंदन केलेल्या सर्व भाजपा नेत्यांचे अजित पवार यांनी आभार मानले. अजित पवारांनी स्वगृही परतावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एका बाजूला प्रयत्न करत असताना, त्यानंतर अजित पवारांनी एक सूचक ट्विट करत महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आणला आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार साहेब आमचे नेते आहेत. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून लोकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे.
अजित पवार यांच्या ट्विटला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे. “आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहात. पवार साहेबांच्या सावलीत आपण सगळेच वाढलो आहोत. मात्र, राज्याच्या हितासाठी भाजपासोबत न जाण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. साहेबांच्या या निर्णयाचा आदर ठेवून आपण परत या,” असं आवाहन पाटील यांनी अजित पवारांना केलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post