एनडीएमधून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकताच बाकी : राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. लवकरच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि महाराष्ट्राला गोड बातमी मिळेल असंही वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. एनडीएच्या बैठकीला शिवसेना हजर राहिली नाही याबाबत विचारलं असता त्यांनी आम्हाला बोलावलं की नाही बोलावलं हे माहित नाही मात्र न जाण्याचा निर्णय आधीच ठरला आहे. एनडीए ही कोणाचीही जहागीर नाही आम्ही एनडीएच्या स्थापनेपासून आहोत असंही संजय राऊत म्हटलं आहे.
महाराष्ट्रात जो सत्ता पेच निर्माण झाला त्यानंतर शिवसेनेच्या केंद्रातल्या मंत्र्याने राजीनामा दिला तो अशासाठी की दिला लोकांचा आमच्यावरुन विश्वास उडू नये. एनडीएच्या स्थापनेत बाळासाहेब ठाकरे, अकाली दल यांचाही मोठा सहभाग होता. आत्ता जे सूत्रधार आहेत ते त्यावेळी नव्हते, असाही टोला संजय राऊत यांनी लगावला. तुम्ही बाहेर पडण्याची औपचारिकता बाकी आहे का? असं विचारताच संजय राऊत यांनी असं म्हणायला काहीही हरकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
महापालिका निवडणुकांमध्येही मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेचाच महापौर होणार असंही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शरद पवार यांनी कालच सांगितलं की हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्याचीही आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. इतकंच नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या अडीच अडीच वर्षांचा कार्यक्रम वगैरे मुळीच ठरलेला नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमावर चर्चा करतो आहोत. या चर्चेतून लवकरच मार्ग निघेल आणि महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळेल असाही विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post