पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे मानले आभार


एएमसी मिरर : वेब न्यूज
कर्तारपूर कॉरिडॉरचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या सहकार्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे आभार व्यक्त करत दोन्ही देशांत शांतता राहावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांच्या हस्ते इंटेग्रेटेड चेक पोस्टचे उद्घाटन करण्यात आले. भारताच्या भावना समजून घेत पाकिस्तानने सहकार्य केले. त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. आता देशातील शीख भाविक कर्तारपूर दर्शनाला जाऊ शकतील याचा आनंद असल्याचेही ते म्हणाले.
या सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, नवज्योत सिंग सिद्धू, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, खासदार सनी देओल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुनानक देव यांच्या 550 व्या जंयतीनिमित्त शीख भाविकांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले. मात्र, यावेळी कश्मीरचा उल्लेखही त्यांनी केला. कश्मीरच्या जनतेच्या मानवाधिकार आणि हक्कांचा विचार करून दोन्ही देशांनी एकत्र चर्चा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आम्ही शीख भाविकांसाठी फक्त सीमा खुल्या करत नसून आमच्या हृदयातही त्यांना स्थान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली. कर्तारपूर कॉरिडॉर सुरू झाल्याने दोन्ही देशातील संबंध सुधारत आहेत. या निमित्ताने दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा सिंग यांनी व्यक्त केली.
हा कॉरिडॉर सुरू करून पाकिस्तानने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, असे सांगत नवज्योतसिंग सिद्धूने इमरान खान यांची स्तुती केली. इमरान हे सिंकदर असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post