केरळमधील वादळात हरवलेली बोट महाराष्ट्राच्या समुद्र किनारी सापडली


एएमसी मिरर : वेब न्यूज
सुमारे वीस दिवसांपासून अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळात भरकटलेली व निर्मनुष्य असलेली केरळ राज्यातील मासेमारी करणारी बोट पालघरसमोरील समुद्रात स्थानिक मच्छीमारांना सापडली आहे. या बोटीचा तपास करण्याचा प्रयत्न कोस्ट गार्ड व मत्स्य व्यवसाय विभाग गेल्या अनेक दिवसांपासून करत असताना सातपाटीच्या मच्छीमारामुळे या बोटीची माहिती मिळाली आहे.
१९ ऑक्टोबर रोजी केरळमधून मासेमारीसाठी निघालेल्या काही बोटींपैकी तीन बोटी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भरकटल्या होत्या. त्यापैकी एक नादुरुस्त झाल्याने बोटीच्या मदतीसाठी धावून गेलेल्या दुसऱ्या बोटीमध्येही तांत्रिक बिघाड झाला. याबाबत कोस्ट गार्डला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या बोटीवरील अधिकांश खलाशांची सुरक्षितपणे सुटका केली, मात्र या दोन्ही बोटी समुद्रात बेपत्ता झाल्या होत्या.
सातपाटी येथील श्री सर्वोदय सहकारी मच्छिमार सोसायटीचे माजी चेअरमन विनोद पाटील हे काल रात्री साडेसात वाजताच्या सुमारास खोल समुद्रात मासेमारी करत असताना समुद्रकिनार्‍यापासून ४३ नॉटिकल माईल्स इतक्या अंतरावर त्यांना एक अज्ञात बोट आढळून आली. या बोटीवर कोणत्याही प्रकारचे दिवे किंवा खलाशी नसल्याने तसेच बोटीवरून दुर्गंधी येत असल्याने या बोटींबाबत संशय निर्माण झाला. त्यांनी या बोटींच्या संदर्भातील माहिती सातपाटी सागरी पोलीस स्टेशन, पालघर तहसीलदार, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त व इतर शासकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर ही नौका केरळमधील असल्याचं निष्पन्न झाले. या बोटीची रेखांश अक्षांश विनोद पाटील यांनी संबंधित विभागांना दिली असून, बोटीचा ताबा घेण्यासाठी बोट मालक मुंबई येथे दाखल झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post