‘महा’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफ सज्ज

 
एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात अगोदरच अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले असताना, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आलेला आहे. त्यात भर म्हणून आता अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’चक्रीवादाळाचा प्रभाव आणखी चार दिवस कायम राहणार असल्याचे समोर आले आहे. हे चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकल्यावर त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘एनडीआरएफ’चे पथक सज्ज झाले आहे.
अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीव राज्याच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.
राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.
शिवाय उत्तर महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याला सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा वादळी पावसाने झोडपलं आहे. नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दीवचा समुद्रकिनारा आणि गुजरातच्या पोरबंदर बंदराच्या दरम्यान हे वादळ जमिनीला धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील. 120 किमी प्रतितास पर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post