दादागिरी नही चलेगी; सभागृहात भाजपा आमदारांची घोषणाबाजी


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडत असून यावेळी भाजपा आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा भाजपा आमदारांकडून देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरुवात होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन संविधानाच्या तरतुदीप्रमाणे होत नसून बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. रात्री अपरात्री बोलावून, असं अधिवेशन होत नाही, आमचे सदस्य ठरावाला पोहचू नयेत, म्हणून रात्री निरोप दिला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नव्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने व्हायला हवं होतं. हे अधिवेशन नियमाला धरुन नाही. २७ नोव्हेंबरला राष्ट्रगीत झालं म्हणजे अधिवेशन स्थगित झालं. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
यानंतर विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावलं असून, हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांचा आक्षेप फेटाळून लावला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मंत्र्यांचा परिचय करुन दिला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेली शपथ संविधानानुसार नाही, त्यामुळे त्यांचा परिचय संविधानाला धरुन नाही, असा आक्षेप घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post