कोणत्याही किंमतीत मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
“राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार नाही,” अशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर केली. त्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर सणसणीत टोला लगावला आहे. “कालपर्यंत भाजपाचं नेतृत्व सांगत होतं की, मुख्यंत्री भाजपाचाच होणार. पण, भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर मुख्यमंत्री कसा होणार,” असा सवाल करत “कोणत्याही किंमतीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,”असा दावा राऊत यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपा सरकार करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. खासदार राऊत म्हणाले, “कालपर्यंत भाजपाचं नेतृत्व सांगत होतं की मुख्यमंत्री आमचाच होणार. पण आता भाजपा सत्ता स्थापन करणार नसेल तर त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार? त्यांनी सरकार स्थापनेतून माघार घेतली आहे. त्यांचा सगळा अट्टाहास मुख्यमंत्रीपदासाठी होता. शिवसेनेशी झालेला करार पाळणार नाही ही कोणती भूमिका होती. भाजपा आता मुख्यमंत्री पदाचा हट्ट कसा पुरवणार?,” असा चिमटा राऊत यांनी भाजपाला काढला.
शिवसेना सरकार स्थापन करणार का? प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, “आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे की, आगामी काळात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे. महाराष्ट्राला कोणत्याही किंमतीत शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार,”असंही राऊत यांनी सांगितलं.

Post a Comment

Previous Post Next Post