पावसाची विश्रांती; महाराष्ट्रात थंडी अवतरणार!


एएमसी मिरर : वेब न्यूज
लांबलेल्या पावसामुळे सुमारे पाच महिन्यांनंतर राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश भागातील तापमानात घट होणार असल्याने थंडी अवतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत राज्यात कोठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मोसमी पाऊस देशातून परतल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्याचे रुपांतर चक्रीवादळात होऊन गेल्या महिनाभरात चक्रीवादळांची मालिकाच निर्माण झाली. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यासह नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी होती. लांबलेल्या पावसाने शेतीमालाचे नुकसान झाले आणि नागरिकही हैराण झाले. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस थांबतो, अशीच भावना निर्माण झाली.
जूननंतर एकदाही राज्यात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली नव्हती. पाच महिन्यांत काही आठवडे वगळता इतर सर्व दिवस पावसाची शक्यता किंवा ढगाळ स्थितीचा अंदाज देण्यात येत होता. त्यानंतर पहिल्यांदाच कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दिवसाचे कमाल तापमान वाढले, तर रात्रीच्या किमान तापमानात काहीशी घट झाली होती. सध्या दोन्ही तापमानात घट होत आहे. रात्रीचा गारवा वाढणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आले आहे. नगर, महाबळेश्वर, मुंबई, रत्नागिरी, गोंदिया आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अलिबाग, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी या ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे. 
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर असलेले बुलबुल हे अतितीव्र चक्रीवादळ शनिवारी उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर आहे. समुद्रातील उबदारपणा आणि वातावरणातील दोन थरातील वाऱ्यांच्या वेगातील तफावतीमुळे पुढील काही दिवसांत चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्राच्या वातावरणावर फारसा परिणाम होणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post