९२ वर्षीय वकिलाने ४० वर्ष मांडली हिंदू पक्षाची बाजू


एएमसी मिरर : वेब न्यूज
राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला. अनेक दशकं चाललेल्या या खटल्यात वरिष्ठ वकील के. पारासरन यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. ९२ वर्षांच्या पारासरन यांनी या खटल्यात हिंदू पक्षाची बाजू मांडली. विशेष म्हणजे मागील चाळीस वर्षांपासून ते या खटल्यामध्ये हिंदूंची बाजू मांडत होते.
माजी अटॉर्नी जनरल असलेल्या पारासरन यांना मदत करण्यासाठी काही तरुण वकील त्यांच्या टीममध्ये काम करतात. ‘मला नेहमीच भगवान रामाबद्दल अध्यात्मिक ओढ होती. त्यामुळेच मी हा खटला लढवण्याचे ठरवलं,’ असं पारासरन सांगतात. आपली बाजू मांडण्याआधी त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. ते रोज सकाळी साडे दहापासून या प्रकरणाचा अभ्यास करायचे. त्यांचे यासंदर्भातील वाचन आणि काम हे सकाळी साडेदहापासून संध्याकाळी उशीरापर्यंत चालायचे.
पारासरन यांच्या मदतीला तरुण वकिलांची एक टीम आहे. त्यांच्या टीममध्ये पीव्ही योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, अदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्ती वर्धन सिंह ही तरुण वकील मंडळींनी पारासरन यांच्यासोबत या खटल्याचे काम केलं आहे. ९३ व्या वर्षाच्या पारासरन यांची जिद्द, चिकाटी पाहून या तरुणांनाही हुरुप यायचा.
पारासरन यांचा अयोध्या खटल्याचा इतका अभ्यास होता की ते अनेकदा न्यायलयासमोर खटल्यातील महत्वाच्या तारखा बोलता बोलता सांगायचे, असं त्यांच्या टीमधील सदस्य सांगतात. कोणत्या दिवशी काय घडलं होतं हे पारासरन बोटांची आकडेमोड करुन सांगायचे. ‘पारासरन यांनी अयोध्यावर एवढे संशोधन आणि वाचन केले आहे की त्यांच्यावरच एक पुस्तक लिहिता येईल,’ असं या टीमचे सदस्य सांगतात.
अयोध्या सुनावणीदरम्यान पारासरन आणि मुस्लीम पक्षाची बाजू मांडणाऱ्या राजीव धवन यांचा युक्तीवाद झाला होता. धवन हे त्याच्या अभेद्य युक्तीवादासाठी ओळखले जातात. मात्र पारासरन मागील ४० वर्षांपासून या खटल्यावर काम करत राहिले. एकदाही त्यांनी हार मानली नाही. मागील महिन्यामध्ये राजीव धवन यांनी न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयामध्येच हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वक्तव्यांची कागदपत्रे फाडली तेव्हा सुद्धा पारासरन शांत होते. १६ ऑक्टोबरला झालेल्या या घटनेनंतर पारासरन यांनी धवन यांची भेट घेतली. दोघांनाही काही काळ एकमेकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एकत्र फोटोही काढला. यामधून पारासरन यांना एकच संदेश द्यायचा होता. न्यायालयामध्ये एकमेकांविरोधात लढणारे वकील हे एकमेकांविरोधात नसून ही मुद्द्यांची लढाई हेच पारासरन आणि धवन यांना आपल्या कृतीतून दाखवून द्यायचे होते.

Post a Comment

Previous Post Next Post