बल्लाळच पाहिजेत असे कसे? बिल्डरांची मागणी चुकीची : आयुक्त भालसिंग


एएमसी मिरर : नगर
नगररचना विभागातील कामकाज सुरळीत करण्यासाठी अभियंता कल्याण बल्लाळ यांची पुन्हा या विभागात नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी बिल्डरांनी गुरुवारी (दि.14) मनपात महापौर व आयुक्तांची भेट घेतली. मात्र, प्रशासनाने कुणाची नियुक्ती करायची हा अंतर्गत प्रश्न आहे. बल्लाळच हवेत, अशी मागणी कशी करता येईल, असा सवाल करत आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी बिल्डरांची मागणी चुकीची असल्याचे पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या नगररचना विभागातील अनागोंदी व अडवणुकीबाबत झालेल्या तक्रारीनंतर आयुक्त भालसिंग यांनी कठोर भूमिका घेत अभियंता बल्लाळ यांच्यासह तेथील कर्मचार्‍यांच्या इतरत्र बदल्या केलेल्या आहेत. या विभागात सध्या नव्याने कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कामकाजात काही प्रमाणात विस्कळीतपणा आलेला आहे. मात्र, नवीन कर्मचार्‍यांना कामकाजाबाबत माहिती देऊन, प्रशिक्षण देऊन कामकाज सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच शहरातील बिल्डर व्यावसायिकांनी महापौर व आयुक्तांना निवेदन देऊन अभियंता बल्लाळ यांची पुन्हा या विभागात बदली करण्यासाठी साकडे घातले आहे.
गुरुवारी सकाळी या व्यावसायिकांनी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त भालसिंग यांची मनपात भेटही घेतली. या संदर्भात आयुक्त भालसिंग यांनी मात्र कुठलेही ठोस आश्वासन दिलेले नाही. कोणत्या विभागात कुणाची बदली करायची हा प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे. बल्लाळ यांनाच या विभागात पुन्हा नियुक्त करावे, अशी मागणी कशी करता येईल, असे म्हणत ही मागणी चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिल्डरांना कुठलेही आश्वासन दिलेले नाही. विभागातील कामकाजात सुरळीतपणा आणण्यासाठी तेथील नवीन कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठीही विभागात अधिकारी उपलब्ध आहेत, असेही आयुक्त भालसिंग यांनी सांगितले.

चारठाणकर, इथापे, जोशी अडाणी आहेत का?
नगररचना विभागात तांत्रिक अडचणी बल्लाळच सोडवू शकतात, असा दावा बिल्डरांचा आहे. विभागातील तांत्रिक स्टाफ अचानक बदलल्यामुळे अडचणी येत असल्याचा साक्षात्कार नगररचनाचे सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांना झालाय. ज्या कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी बदल्या केल्या त्यात एकही तांत्रिक पात्रता असलेला कर्मचारी नव्हता. नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देउन कामकाज काही दिवसात सुरळीत होऊ शकते. तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी या विभागात चारठाणकर, वैभव जोशी व सुरेश इथापे असे तीन प्रमुख व अनुभवी अभियंते आहेत. जोशी व इथापे यांना शहराची संपूर्ण माहिती आहे. तांत्रिक अडचणी सोडविण्यास हे अधिकारी सक्षम नाहीत का? हे तिघेही अडाणी आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. बिल्डरांच्या दाव्यानुसार बल्लाळ जसे त्यांना सहकार्य करतात तसे इतर अधिकारी का करत नाहीत? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post