भाजपच्या मदतीला 'तरुण भारत', राऊत यांच्यावर टीका


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ‘सामना’मधील अग्रलेखांबरोबरच पत्रकार परिषदांमधून भाजपावर टीका करत आहेत. भाजप नेत्यांकडून या टीकला ठोस प्रत्त्युत्तर मिळत नसले तरी शिवसेनेच्या हल्ल्यामुळे नामोहरम झालेल्या भाजपच्या मदतीसाठी आता ‘नागपूर तरुण भारत’ धावून आल्याचे चित्र आहे. या वृत्तपत्रातील अग्रलेखामधून राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
राऊत यांचे नाव न घेतला त्यांचा ‘बेताल’ असा उल्लेख करण्यात आला आहे. राऊत हेच राज्यामध्ये महायुतीचे सरकार आणण्यात अडथळा निर्माण करत असून संजयच धृतराष्ट्र होणार असेल, तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी चिंतन होणे आवश्यक असल्याची टीका या अग्रलेखामधून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिवसेनेला कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात शिवसेनेच्या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘राज्यातील दोन तृतीयांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्यांचे दुःख वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही, हेही तितकच जळजळीत वास्तव आहे. उद्धव ठाकरेंची राजकीय समज त्यांची परिपक्वता समंजसपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडिकीने काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक असताना 'बेताल' शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे,’ अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.
शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या संभाव्य युतीवरही या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंनी आपली हयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीतून महाराष्ट्राचे सुटका करण्यासाठी घालवली. हा 'बेताल' मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळवण्याच्या मागे लागला आहे. १९९० पासून निवडून आलेल्या जागांचा संदर्भ देत शिवसेना विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी संख्याबळाचा संदर्भ देत होती. मग ते आता मुख्यमंत्रिपदाबाबत कसा दावा करु शकतात,’ असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच हा 'संजय धृतराष्ट्र' होत असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. ‘संजयनं दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण संजय धृतराष्ट्र होणार असेल तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी चिंतन होणे स्वाभाविक आहे,’ असे म्हटले आहे. दरम्यान, सोमावारी सकाळी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘तरुण भारत नागपूर’ नावाचे कोणते वृत्तपत्र आहे, हे मला ठाऊक नाही, असे उत्तर देत राऊत यांनी या टीकेवर भाष्य करणे टाळले.

Post a Comment

Previous Post Next Post