अजित पवारांनी 54 आमदारांच्या सह्यांचे पत्रही पळवलेएएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचा विधीमंडळ गटनेता या नात्याने अजित पवार यांनी भाजपच्या सोबतीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन करण्याबाबत अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटरहेडवरील एक पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. परंतु हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारसाठी तयार केले होते. तेच पत्र अजितदादांनी पळवले आहे, व भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी या पत्राचा दुरूपयोग केल्याचे समोर आले आहे.
पत्राचा दुरूपयोग झाल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मान्य केले आहे. काही आमदारांनाही अजित पवार यांनी फसवून राजभवनात नेले होते. त्यातील काही आमदार आता शरद पवारांच्या घरी परतले आहेत. हे आमदार १२.३० वाजता शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेत येतील, असे मलिक यांनी म्हटले आहे.
अजितदादा यांच्यासोबत राजभवनात शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सुमारे 12 आमदार गेले होते. यातील किती आमदार अजित पवार यांच्याबरोबर ठाम राहतील याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दरम्यान, हे सरकार धोका देऊन बनलेले आहे. त्यामुळे ते टिकणार नाही. विधीमंडळाच्या पटलावर हे सरकार बहुमताअभावी पडेल, असा दावाही मलिक यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post