अजित पवारांच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी अचानक भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत. ठिकठिकाणी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहेत. तसेच शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला जात आहे. कल्याणमध्ये अजित पवार यांच्या फोटोला चप्पल मारून त्यांच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
अजित पवार यांनी सकाळी राज्यभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. महापालिका गटनेता कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या फोटोला चप्पल मारून आपला राग व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी हा निषेध करणाऱ्या जव्वाद डॉन आणि उमेश बोरगावकर यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळला. त्यानंतर अजित पवारांचे समर्थकही त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले.
सोलापुरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये देखील उघड-उघड फूट पडल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा पुतळा जाळत आपला संताप व्यक्त केला. पक्षाला अंधारात ठेवून अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप यावेळी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा देखील दिल्या.
पालघरमध्ये देखील अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यात पालघरमधील संतप्त शिवसैनिक आघाडीवर होते. त्यांनी रस्त्यावर उतरुन अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी ‘अजित पवार मुर्दाबाद, मुर्दाबाद’, ‘अजित पवार *** है *** है’ अशा घोषणा देत आपला असंतोष व्यक्त केला.
अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत देखील शरद पवार यांना पाठिंबा देणारे फ्लेक्स लावण्यात आले. यावर बारामतीकर 80 वर्षांच्या योद्ध्यासोबत उभे असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, दुपारनंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हा फ्लेक्स काढत, थेट शरद पवार यांच्या पाठिंब्यालाच विरोध केला.
शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भाजपला पाठिंबा दिल्याने अजित पवार यांच्या विरोधात ठाण्यातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर फाडले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले.
राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर नाशिकमधील भाजप आणि राष्ट्रवादी कार्यालयांबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षातील एक मोठा गट अजित पवारांच्या निर्णयावर नाराज असल्याने कोणताही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सध्या दोन्ही कार्यालयांबाहेर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती आहे.
अजित पवारांच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याने रायगडमध्ये त्यांच्या फार्महाऊसवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. खालापुर तालुक्यातील भिलवले येथे ए. जी. मरकंटाईलच्या नावे असलेले फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस खालापूर तालुक्यातून कर्जतकडे जाणाऱ्या रोडजवळील भिलवले गावात आहे. परिसरातील नागरिक अजित पवारांचा फार्महाऊस म्हणूनच या फार्महाऊसला ओळखतात.

Post a Comment

Previous Post Next Post