..तर हे सरकारही पडेल : अजित पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या परिस्थित शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारनं उभं राहायला हवं. शेतकरी मोडला तर हे सरकारही पडेल, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राष्ट्रवादीचे विधिमंडळातील गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे या शिष्टमंडळात होते.
अजित पवार म्हणाले की, अवकाळी पावसामुळं राज्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात माहिती देण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. या पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करणं गरजेचं आहे. काळजीवाहू सरकार यात फार काही करू शकत नाही. त्यामुळेच राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी आम्ही केली आहे.
काळजीवाहू सरकारनं जाहीर केलेली १० हजार कोटींची रक्कम तुटपूंजी आहे. त्यात काहीही होणार नाही. त्यासाठी २५ हजार कोटींची गरज आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असल्यानं मर्यादा येतात. केंद्राकडून कधी मदत येईल सांगता येत नाही. त्यामुळं सेफ अॅडव्हास काढून शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जावी अशी मागणी केली आहे.
आघाडी सरकारच्या काळात कधीही अशी परिस्थिती आली नव्हती. द्राक्षांच्या बागासह सोयाबीन, मका, बाजरीसारखी पिकं पूर्णपणे वाया गेली आहेत. ऊसाचंही नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी हेक्टरी दीड लाखांची मदत दिली जावी. तर सोयाबीन, मका, बाजरी यासारख्या पिकांसाठी हेक्टरी ५० हजारांची मदत सरकारनं करायला हवी. त्यात समुद्रात वादळ निर्माण झाल असल्यानं मच्छिमारांचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करावी. तसेच पीककर्ज माफ करावं, वीज बिल माफ करावं, अशी मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post