'निशांत'ची साहित्य फराळाची परंपरा कायम


एएमसी मिरर : नगर
यंदाच्या दिवाळी सणावर अतिवृष्टी, महागाई व मंदीचे सावट जाणवत असतांना विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अनेक दिवाळी अंकाचे प्रकाशन होऊ शकले नाही, हे वास्तव आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातून 19 वर्षांपासून सातत्याने वाचकांना दिवाळीच्या सणाला साहित्य फराळ देण्याची परंपरा निशांत दिवाळी अंकाने कायम ठेवली आहे.
राज्यस्तरीय विविध पुरस्कार प्राप्त निशांत दिवाळी अंकाची 19 वी आवृत्ती वाचकांच्या हाती देतांना मनस्वी आनंद होत असल्याची भावना संपादक निशांत दातीर यांनी व्यक्त केली.
यावर्षीच्या अंकात आंतरराष्ट्रीय व्यापार युद्ध आणि मंदिची पडछाया या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजयकुमार पोटे, भागा वरखडे, कैलास ढोके, अशोक ढगे यांचे परखड विचार प्रसिद्ध केले आहेत.
पाणी आणायचं कुठून आणि वाचवाचं कसं या परिसंवादात नद्या प्रदुषण मुक्तीचे अभ्यासक अनिल पाटील, पर्यावरण तज्ञ विनोद बोधणकर, मुकुंद गायकवाड, उदय गायकवाड तसेच काय घडतयं शिक्षण विश्‍वास या परिसंवादात पंडित विद्यासागर, विवेक वेदनकर, प्रा. देवांग शिंदे, भाऊ चासकर, रमेश पानसे, कृतीका बुरघाटे, आणि भगव्याने मारली बाजी या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार विश्‍वास महेंदळे, सचिन सावंत, राजु वाघमारे, डॉ.कांता नलवडे, सुहास वारे आदि मान्यवरांचे विचार निशांत दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
राजकीय व बौद्धीक परिसंवादाबरोबरच चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांच्या अनुभवाही यावर्षीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये सिने अभिनेत्री मानसी नाईक, मृण्मय देशपांडे, जितेंद्र जोशी, भारत गणेशपुरे, अक्षय टंकसाळे, अभिज्ञा भावे यांचे विविध अनुभवांस प्रसिद्धी देण्यात आली आहे.
पु.लं. देशपांडे यांच्या विनोदाचे स्वरुप या विशेष लेखाचे डॉ.श्रीकांत नरवडे यांनी लेखन केले असून, याबरोबरच बोल बसमती बोल या डॉ.अंजली श्रीवास्तव यांच्या लेखाचा समवेश आहे. येथील सुप्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.रत्ना नजन, नागेश शेवाळकर, काशिनाथ बारंबे, निर्मला भयावळ यांच्या लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार महादेव साने यांचे सद्याच्या परिस्थितीवरील व्यंगचित्रेही आहेत, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post