भाजप-शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. भाजप आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.
नितीन गडकरी शिष्टाई करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील, तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल, असं जर माध्यमांना वाटत असेल, तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही, असंच म्हणावं लागेल. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत, तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे हे मातोश्रीवर आले होते त्यांना भेट नाकारण्यात आली का? असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला, तेव्हाही मध्यस्थीसाठी कोणीही येण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post