शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही : शरद पवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात भाष्य करताना शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यानंतर भाजपाकडून जादूई आकड्याची चाचपणी करण्याबरोबरच शिवसेनेला सोबत घेण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. जयपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार सुरु आहे. पण, काँग्रेस विरोधी पक्षात बसणार, असाही सूर काही काही नेते लावत आहेत. मात्र, पडद्याआड होत असलेल्या घडामोडींमुळे धक्कादायक वाटावा, असाही निर्णय काँग्रेस घेऊ शकते.
शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस काहीअंशी अनुकूल असल्याचं दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं एक सूत्र पडद्यामागं आकार घेत असल्यानं महाशिव आघाडीचं सरकार बघायला मिळू शकते, अशीही चर्चा सुरू आहे. तर राज्यातील स्थितीबाबत काँग्रेसचं विचारमंथन सुरू असताना शरद पवार यांनीही भूमिका मांडली आहे. आघाडीबाबत शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. अधिकृत प्रस्ताव आल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post