एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले आहे. मात्र, यावेळी त्यांनी लोकसभेत हे विधान केल्याने मोठा गदारोळ झाला. साध्वींच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवला. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ठाकूर यांची टिप्पणी कामकाजाच्या पटलावरुन रद्द केली.
लोकसभेत जेव्हा एसपीजी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु होती, तेव्हा द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी गोडसेच्या एका विधानाचा हवाला देत म्हटले की, त्याने महात्मा गांधींना का मारले? या विधानावर साध्वी प्रज्ञासिंह यांनी राजा यांना मध्येच थांबवत म्हटले की, आपण इथे एका देशभक्ताचे उदाहरण देऊ शकत नाही.
राजा यांनी म्हटले की, गोडसेने स्वतः हे कबूल केले होते की, ३२ वर्षांपासून त्याने महात्मा गांधीविरोधात आपल्या मनात द्वेष बाळगला होता. त्यानंतर शेवटी त्याने गांधीजींची हत्या करण्याचा निर्णय घेतला. गोडसेने गांधींची हत्या यासाठी केली की तो एका विशिष्ट विचारधारेचा होता.
राजा यांचे भाषण सुरु असताना साध्वी मध्येच उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांना हटकले तसेच एका देशभक्ताचे तुम्ही इथे उदाहरण देऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर भाजपाच्या अनेक खासदारांनीही खासदार साध्वी यांना खाली बसण्याची विनंती केली. दरम्यान, साध्वी यांच्या या विधानावर काँग्रेसने तिखट प्रतिक्रिया दिली असून आता देश मोदी आणि भाजपाला देखील मनापासून माफ करु शकणार नाही, असे म्हटले.
दरम्यान, सभागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत विचारले. यावर त्यांनी पहिल्यांदा तुम्ही माझे विधान पूर्ण ऐका असे सांगत मी यावर उद्या उत्तर देईन असे म्हटले.
Post a Comment